लोणावळ्याच्या पिकनिक नंतर अत्यंत अपराधीपणाची भावना मनात असल्याने मी सोनलला टाळू लागलो. मुंबईला परत येताना तर मी नजरही मिळवू शकलो नव्हतो तिच्यासोबत. तिच्या मेसेजना रिप्लाय देत नव्हतो, ती समोर दिसली तर रस्ता बदलून जात होतो. कट्ट्यावर जायचं तर जवळजवळ बंदच केलं होतं. अभ्यासाची कारणं देऊन गँगला टाळत होतो.
आला दिवस ढकलून, लवकरात लवकर ह्या गोष्टीतून बाहेर यायचा प्रयत्न करत होतो. पण कधी ना कधी संकटाला सामोरं जावं लागणारच होतं. त्या दिवशी चकल्या करायला म्हणून आई मराठे काकूंच्या घरी गेली होती आणि तीच संधी साधून सोनल घरी येऊन धडकली होती. इथून मी पळून जाऊ शकत नाही हे तिला बरोबर माहीत होतं.
"वॉट्स राँग विथ यु? का टाळतोयस मला. तुझं काम झालं म्हणून मला टाळतोयस? वापरलं की टाकून द्या अशीच मनोवृत्ती आहे का तुझी? की तुला माझी कलीग प्रिया आवडलीय? खूप बोलत होतास तिच्याशी, पाहिलंय मी." सोनल खूपच चिडली होती आणि असबंध बोलत होती.
"काय बोलतेयस तू सोनल? मला मान्य आहे चुकी झाली माझी. पण हे आरोप..." सोनलने मला बोलणं पुरं करू दिलं नाही.
"चुकी झाली? कुक्कुलं बाळ आहेस तू? आपण दोघांनी जे केलं ते स्वेच्छेने आणि दोघांच्याही सहमतीने केलंय. मला ह्यात काही चूक वाटत नाहीये." सोनल ने नेहमीप्रमाणे सडेतोड तिची बाजू मांडली.
"मला मान्य आहे की आपण स्वेच्छेने आणि सहमतीने केलंय सर्व. पण माझं चुकलंय हेच की.." मी शब्द शोधू लागलो.
"हेच की काय?" सोनल उतावीळपणे विचारू लागली.
"हेच की मी तुझ्याशी केलेला प्रणय हा भावनाहीन होता. इन फॅक्ट आता ही मला तुझ्या बद्दल मैत्री व्यतिरिक्त वेगळ्या भावना नाहीत." मीही सरळ मुद्द्याला हात घातला.
"मग माझ्या भावनांचं काय? मी तर तुझ्यावर प्रेम करायला लागलेय पिकनिक नंतर तर आधी पेक्षा जास्त." सोनलच्या आवाजातील ताठरता आता लोप पावली होती.
"म्हणूनच तर मला अपराधी वाटतंय. सॉरी सोनल. मी संयम ठेवायला हवा होता. पण माझं तुझ्यावर प्रेम वैगेरे नाहीये." मी विनयशीलतेने पण कणखरपणे तिचं प्रेम नाकारलं.
"मी इतक्या सहजासहजी विसरू शकत नाही हे. जर मला जड जाणार असेल तर तुला अतिजड जाणार हे प्रकरण. लक्षात ठेव." धमकीवजा इशारा देऊन सोनल निघून गेली.
महिनाभरात सर्व पूर्वपदावर येईल असं गृहीत धरून मी वावरू लागलो. पण सोनल मानगुटीवर बसणार होती हे हळूहळू स्पष्ट होत होतं.
"श्रीकांत, तू तर खिलाडी निघालास. आम्हाला वाटलं त्यापेक्षा खूपच फास्ट आहेस तू तर" सागरने रात्री जेवणानंतर कट्ट्यावर बोलावून घेतलं होतं बोलायला.
"म्हणजे? नाही कळलं मला" मी सावध पवित्रा घेतला आणि अधिक माहिती विचारली.
"हे बघ वेड पांघरूण पेडगावला जाऊ नकोस, नेहाने मला सर्व सांगितलं आहे. सोनलने तिला लोणावळा पिकनिक बद्दल इत्यंभूत माहिती दिलीय." सागर माझ्यावर डोळे रोखत बोलला.
खुपच अवघडलो मी, स्वतःच्या बदनामीची चिंता न करता सोनल असं कसं सांगू शकते कोणाला? ते ही तपशीलवार..
"हे बघ सागर, लोणावळ्याला जे काही झालं ते आम्हा दोघांच्या सहमतीने झालंय. आता सोनल 'बळी' पडल्याचा आव आणू शकत नाही. सोनलने नेहाला हे सगळं सांगण्यामागचा उद्देश मला माहित नाही. पण आपण ह्यावर जास्त चर्चा न केलेली बरी. ती तीन बहिणींमध्ये सर्वात मोठी आहे. ही गोष्ट बाहेर पडली तर बदनामी होऊ शकते." मी
"श्री, सोनल चांगली मुलगी आहे. लहानपणा पासून मी तिला ओळखतो. तिचं तुझ्यावर प्रेम आहे. तुला काय हरकत आहे मग?" -सागर
"कशाबद्दल हरकत? काय बोलतेयस तू?" मी न समजून प्रश्न विचारला.
"तुला प्रेम करायला काय हरकत आहे? असंही नात्यात तुम्ही खूप पुढे गेला आहात." -सागर
"मूर्ख आहेस तू. असं तू किंवा तिने सांगितल्यावर प्रेम होतं का? आणि सध्या तरी मला सोनल बद्दल असं प्रेम वैगेरे काही नाहीये. माझ्या लक्षात येतंय तू मला भेटायला का बोलावलं आहेस ते. माझा निरोप तू पोहचव आणि पुन्हा मला समजावण्याचा भानगडीत पडू नकोस." आता मला कळून चुकलं होतं की सोनलने नेहाला पिकनिक बद्दल सगळं का सांगितलं ते. पण असा दबाव आणून मला तिच्यावर प्रेम होणार होतं का?
त्या नंतर सोनलने हर एक प्रकाराने मला प्रेमात पाडण्याचा प्रयत्न केला. कित्येकदा नेहाने सोनल किती 'बिचारी' आहे आणि तिच्यावर कसा अन्याय होतोय असं मला पटवून द्यायचा प्रयत्न केला.
गिफ्ट, फुलं, ग्रीटिंगस खूप काही करून झालं. बलिशपणाची हद्द तर तिने रोहितशी फ्लर्ट करून केला, मला मत्सर वाटून मी तिच्याकडे पुन्हा जाईन असं तिला वाटत होतं. पण तिच्या प्रत्येक कृतीने माझा निर्णय योग्य आहे हेच मला पटवून दिलं.
"सोनल, बस कर आता. वर्ष होत आलं पिकनिकला. त्यानंतर आपलं धड बोलणं ही नाही झालं. माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेमभावना नाही उत्पन्न होऊ शकत. मला अजून करिअर करायचं आहे, खूप काही प्लॅन्स आहेत माझे. मला ह्या सर्व गोष्टींत नको अडकवूस. प्लिज" सोनलला एकदा कट्ट्यावर बसून समजण्याचा प्रयत्न केला मी.
"श्री तू जितकं मला दूर करतोयस तितकीच मला तुझी आस वाढतेय. मला एक संधी दे. तुला नक्की प्रेम होईल." सोनल विनवणी करत होती.
"संधी दे?? म्हणजे काय करू? प्रेमभावना अशी जागृत नाही होऊ शकत" - मी
"पुढच्या शनिवारी मी घरी एकटीच असणार आहे, तू प्लिज ये. लोणावळा पुन्हा सेलिब्रेट करू आपण. माझ्या प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन निघशील तू." -सोनल
"ते शक्य नाहीये. मला तुझ्या बद्दल त्या भावना नाहीयेत. तुला खोटी आस ही दाखवायची नाहीये मला आणि लोणावळा पिकनिक पण तू लवकरात लवकर विसरून जा." - मी
"श्री प्लिज, बरं राहू दे ते प्रेम वैगेरे, पण कमीतकमी पुन्हा मला तुला अनुभवायचं आहे. आयुष्यात पुन्हा तुला त्रास नाही देणार. पण एकदा तो अनुभव मला पुन्हा हवाय. प्लिज प्लिज.." -सोनल
"शी!! सोनल, काय ही भाषा. तुझं तुझ्या डोक्यावर नियंत्रण नाही राहिलं आहे. आपण न बोललेलंच बरं" इतकं बोलून मी तडकाफडकी तिथून निघून आलो.
त्यानंतर सोनलने माझा पिच्छा सोडला. आता आयुष्य पूर्ववत झालं होतं. कट्ट्यावर पण नियमितपणे जाऊ लागलो होतो. फरक इतकाच होता की सोनालशी मैत्री आता पूर्वी सारखी राहिली नव्हती.
पटापट दिवस जात होते, मलाही आता जॉब मिळून तीनेक महिने झाले होते. डिसेंबर चा महिना होता आणि न्यू इयर पार्टीचा प्लॅन सुरू झाला.
सागरच्या काकांचा कर्जतला फार्म हाऊस आहे. तिथे न्यू इअर सेलिब्रेट करायचं ठरलं. कामाच्या व्यापामुळे पार्टीच्या नियोजनात माझा सहभाग शून्य होता. एकतीस तारखेला माझ्या गाडीतून अजून तिघे येणार एवढंच मला माहित होतं.
खूप काम केल्याने आता पार्टीत खूप धमाल करायची असं ठरवून कर्जतला पोहचलो. आठ साडे आठ वाजता बंगल्यावर पोहचलो खूप उत्साहित होतो, पण तिथे जाताच पूर्ण उत्साहावर पाणी फिरलं.
मुलींच्या घोळक्यात मधोमध सोनल बसली होती, पण आश्चर्य म्हणजे तिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं मी स्वतःहून हाय हॅलो करूनही.
पार्टीला सुरवात झाली सोनल नेहमीपेक्षा जास्तच सुंदर दिसत होती.
"श्री, आता तू स्वतःहून सोनल कडे गेलास तरी ती तुला भाव देणार नाही." मी चोरून सोनलकडे पाहताना सागरने मला रंगेहात पकडलं होतं.
"हाहा!! मला सोनल बद्दल अजूनही काहीच फिलिंग्स नाहीत. फक्त वाईट एकाच गोष्टीच वाटतंय की आम्ही चांगले मित्रं होतो. वैचारिक पातळीवर आम्ही अनुरूप होतो. पण तिच्या त्या हट्टामुळे आमची मैत्री पण तुटली." अगदी सविस्तर मी सागरला सांगितलं
"झालं गेलं विसरून पुन्हा मैत्रीचा हात पुढे का करत नाहीस मग. नवीन वर्ष नवीन सुरवात. व्हॉट से?" सागरने ड्रिंक्स चा ग्लास पुढे करत प्रस्ताव ठेवला.
"हात पोळलेत मागच्या प्रकरणाने. आता काही सुरवात-शेवट नको." मी सरळसरळ विषयाला बगल दिली.
बरोबर बाराच्या ठोक्याला सगळ्यांना हॅपी न्यू इअर विश केलं. सगळे एकमेकांना हग करत होते नव्या वर्षाकडे उमेदीने बघत होते. मी पण बाल्कनीत येऊन रोषणाई बघत होतो. इतक्यात मागून ओळखीचा आवाज आला.
"हॅपी न्यू इअर." सोनल मला विश करायला डेक वर आली होती.
"हॅप्पी न्यू इअर सोनल." मी पण मोजकाच प्रतिसाद दिला.
"एवढा कडवटपणा का आलाय श्री? साधं न्यू इअर विश सुद्धा नाही केलंस?" सोनलने सौम्य हसत विचारलं.
"इतिहास तुला माहीत आहे सोनल, आणि शाहण्या माणसाने इतिहासतुन शिकावं" मी सुध्दा प्रत्युत्तर दिलं.
"हम्म" दीर्घ सुस्कारा सोडत सोनल बोलली "हो. खूपच आततायीपणा केला मी. तू मला दिलेला नकार मला सहन होत नव्हता. पण आता मी ते खूप मागे सोडून दिलंय. करियर वर फोकस केलंय तुझ्यासारखच."
"गुड!! हॅप्पी फॉर यु. मला पण ऑफिसमधून जर्मनीला पाठवताय पण मला नाही जायचंय."
मग आम्ही बाल्कनीत बसून आकाशात रोषणाई बघत बराच वेळ गप्पा मारत बसलो. खूप आठवणींना उजाळा दिला, पोट दुःखेपर्यंत हसलो, काही आठवणीनीं गहिवरून देखील आलं. छान थंडी पडली होती. रात्री खूप उशीर झाला होता. सगळीकडे सामसूम झाली होती एव्हाना.
"श्री तुला माहितेय किती दुखावलं आहेस तू मला?" भावनिक विषयावर बोलता बोलता सोनल पुन्हा माझ्याबद्दल बोलू लागली.
"मी काही जाणीवपूर्वक नाही केलं हे सर्व, मला कधीच तुझ्याशी असलेली मैत्री तोडायची नव्हती पण प्रेम करायला ही जमणार नव्हतं". मी स्पष्ट केलं.
पण सोनल मला आज खूपच भावनिक वाटत होती. मी तिच्यावर खरंच अन्याय तर नव्हता ना केलं, असंही वाटून गेलं. बोलता बोलता सोनलने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि एका नाजूक क्षणी कधी आमचे ओठ एकमेकांत विलीन झाले हेच कळलं नाही. कोणाची तरी चाहूल लागली आणि सोनल भानावर आली आणि पटकन उठून निघून गेली.
दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही पुन्हा मुंबईला आलो पण सोनल कुठेच दिसली नाही, सकाळी लवकर निघून गेली होती ती.
"हम्म! श्री साहेब या. स्वागत आहे तुमचं कट्ट्यावर." सागरने दुसऱ्या दिवशी उपहासात्मकपणे माझं कट्ट्यावर स्वागत केलं.
"काय झालं रे? असा का बोलतेयस" मी सागरला प्रतिप्रश्न केला.
"जरा बाजूला चल मग बोलूयात" असं बोलून सागर मला हाताला धरून बाजूला घेऊन आला.
"प्रेम नाहीये ना तुझं सोनलवर मग पुन्हा तेच का केलंस? की प्रेम नकोच आहे तुला? तुला फक्त उपभोग घ्यायचा आहे ना? एकदा झालेली चुक असते. तू वारंवार सोनलचा फायदा घेतोयस आता. तिच्या भावनांचा अपमान करतोयस. तुला माझा मित्र म्हणवून घेण्याची लाज वाटते मला. उपभोगवादी!! सोनलने तुझ्यात काय पाहिलं देव जाणे." हे सर्व बोलून मला काही कळायच्या आधी सागर निघून गेला.
कट्ट्यावर पण सर्वांच्या नजरेत मला माझ्याबद्दल घृणाच दिसत होती. ह्यावेळी माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मला स्वतःचा खूपच राग येत होता. लाजिरवाणी गोष्ट केली होती मी. सोनलचे पण मेसेजेस यायला लागले होते, त्याचा जास्त त्रास व्हायला लागला होता. दिवसेंदिवस मी खूपच अवघडलो जात होतो.
सोनलला आता मी कोणत्याही परिस्थितीत हवाच होतो. ह्या तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करणं मला जमत नव्हतं. म्हणून मग मी जर्मनीला जायचा निर्णय घेतला आणि ऑफिस मध्ये तसं कळवलं.
विमानात बसलो तेव्हा कुठे सुटकेचा श्वास घेतला. माझ्यासाठी सोनलचा अध्याय आता कायमचा संपला होता. सोनलचा नंबर डिलीट केला तो पुन्हा कधीही सेव्ह न करण्यासाठी...
-शरद नारायण यादव
No comments:
Post a Comment