Thursday, 7 May 2020

प्रतारणा (भाग पाच)

          "अहो, मांजर डोळे मिटून दूध पितं, तर त्याला वाटतं की कोणी बघत नाहीये. पण असं असतं का?" नजर रोखत आणि प्रत्येक शब्दावर जोर देत अश्विनी मला उद्देशून बोलली.

"हो माहितेय की." मी कसानुसा हसत उत्तरलो, आणि काहीतरी गंभीर संभाषण होणार आहे हे ओळखून तिथून पळ काढला. नक्कीच अश्विनीला राधिकाबद्दल कुणकुण लागली असावी. छातीत जोरजोरात धडधडायला लागलं होतं. त्या नंतर दोन तीन दिवस सरळ संभाषण आणि नजर सुद्धा टाळतच होतो.

"रघु, वाचव रे. अश्विनीला राधिकाबद्दल कळलंय बहुतेक. उघड उघड वार नाही केला अजून तिने, पण युद्धा आधीची शांतता जाणवतीये." रविवारी मी रघुनाथकडे मन मोकळं केलं.

"ह्या गोष्टींचा अजून वेगळा अंत काय असणार आहे?  तुझं आणि राधिकाचं अनैतिक नातं आहे. तू मान्य का करीत नाहीस? ते प्लॅटोनिक मैत्री वैगेरे सगळं झूठ असतं रे. तू एक नर आहेस आणि ती मादा हेच सत्य आहे. तेव्हा लवकरात लवकर त्या मादेकडून नैसर्गिक आणि एकमेव असं सुख घेऊन वेगळा हो. ही तुझी शेवटची संधी आहे असं समज." रघुनाथने आपली नेहमीची टेप वाजवली.

रघुनाथ कडून ह्या पेक्षा वेगळी अपेक्षा करणं पण चूकच होत. माझं मलाच ह्या संकटाला सामोरं जावं लागणार होतं. युद्ध सुरु होण्याआधीच शरणागती पत्करावी का हा विचार करत मी घरी आलो. पण घाई घाईत काही निर्णय न घेता सावध पवित्रा घ्यावा असं ठरवलं.

सोमवारी तर ऑफिसला जाताना पण भीती वाटत होती. आज काही नवीन संकट नको रे देवा. केबिन मध्ये जाऊन बसतोय तोवरच मोबाईल वाजला.

'आज संध्याकाळी मरीन ड्राईव्ह? ' राधिकाचा मेसेज आला आणि एक क्षण काळजाचा ठोका चुकला. पण निदान ऐकून तरी घेऊयात ह्या विचाराने मी ठीक आहे म्हंटलं.

"मी दिपकला लग्नासाठी नकार कळवलाय." चौपाटीवर बसता बसता राधिका बोलली. माझी भीती रास्त ठरली होती. राधिकाने बाँबच टाकला होता.

"काय? पण का? इतका चांगला मुलगा आहे. का नकार दिलास? एवढं प्रेम करतो तो तुझ्यावर."

"रिलक्स गुरू, तुझा हात धरून तुझ्या मागे नाही येणार आहे मी. आणि मी तुझी जबाबदारीही नाहीये, तेव्हा असं झटकू नकोस. चांगला मुलगा? तू बोलतोयस हे? तुला माहितेय आम्ही दोघे टोकाचे वेगळे आहोत. माझ्या लग्नाची तू चिंता करू नकोस आता, माझं मी बघते."

माझ्या वागण्याची मलाच शरम वाटली. खरंच मी राधिकाला झटकत होतो. आता नवीन संकट नको होतं मला. दोन्ही आघाड्यांवर एकत्रच हल्ला सुरू झाला होता. घरी जायची पण भीतीच होती.

घरी येऊन बघतोय तर अश्विनी घरात नव्हती, मुलांकडे चौकशी केल्यावर कळलं की ती जिम ला गेलीये.

"तू जिम ला जायला कधी सुरू केलंस?" रात्री बेडरूम मध्ये मी विचारलं. म्हणजे विचारणं भागच होतं. शीत युद्ध सुरू ठेवून मला जमणार नव्हतं.

"का? फक्त आज कालच्या फटाकड्याच स्वतःची योग्य काळजी घेऊ शकतात काय? एके काळी कॉलेज गाजवलंय मी. विसरू नका." ह्या मोर्चावर वेगळ्याच लढाईला सामोरं जावं लागणार असंच दिसत होतं.

सरळ तोंडी उत्तर मिळत नव्हतं, ना अश्विनीकडून ना राधिका कडून. मला लवकरात लवकर सर्व गोष्टी निस्तरण भाग होतं. शुक्रवारच्या भेटी गाठी सुरू होत्या. पण मी औपचारिकच सहभाग घेत होतो.

"मला तुझा क्लोन हवा आहे माझा नवरा म्हणून, कित्येकदा मी तुला पण हे बोललेय. पण ही गोष्ट शक्य नाहीये, हे बुध्दीला पटतंय पण मनाला नाही रे. येणाऱ्या प्रत्येक स्थळात मी तुलाच शोधत असते. आणि मला ही तुलना बंद करायला जमत नाहीये. आय ऍम हेल्पलेस." एका शुक्रवारी राधिका चौपाटीवर बसल्यावर बोलत होती.

मी तिचा हात हातात घेतला, आणि काहीही न बोलता बसून राहिलो काही क्षण. खूप दिवसांपासून विचार करत होतो की कसं समजावू राधिकाला, पळपुटेपणा न करता कशी हाताळू ही परिस्थिती. पण ते कोडं आज सुटलं होतं. काहीही न बोलता खूप संभाषण झाल्यासारखं वाटलं त्या दिवशी.

निघता निघता एक नवी उमेद दिसत होती तिच्या चेहऱ्यावर, आणि मला सुद्धा हलकं हलकं वाटत होतं.

घरी आलो तर अश्विनी चित्रं काढत बसली होती.
"हे काय नवीन आज? तुझा टीव्ही शो बंद झाला का?" मी आश्चर्याने विचारलं.

"इट्स मी टाइम, मला डिस्टर्ब नका करू." तिने माझ्याकडे दूर्लक्ष केलं. एक लढाई जिंकल्यामुळे ही लढाई पण जिंकू असा आत्मविश्वास आला होता.

रात्री बेडरूममध्ये आल्यावर मी सरळ विषयाला हात घातला.

"अश्विनी, हे सर्व का करतेयस तू? जिम, चित्रकला, क्विलिंग. हे तुला खरंच आवडतंय की..?"

"हे सर्व करण्यासाठी मी तरुण नाहीये का?" एक टोमणा.

"काय खदखदतय मनात? मला सांगणार नाहीस का?" मी तिला मायेने जवळ घेत विचारलं. आता तिला बरंच आश्वस्त वाटत होतं. मग भावुक होऊन ती बोलू लागली.

"मला माझं कुटुंब आवडतं. माझा संसार, माझी मुलं, माझं घर हे आवडतं मला. पण काळानुरूप बदलायला पाहिजे ना, नाहीतर अस्तित्वच संपून जाईल माझं. मला भरतनाट्यम आवडतं, मी विशारद पण आहे त्यात. पण त्या सगळ्यांपेक्षा मला माझ्या मुलांचं करायला आवडतं. आणि हे करताना मी माझ्या कुठल्याच स्वप्नाला मुरडही नाही घातली. माझं कुटुंबच माझं जग आहे, ह्यालाच धक्का लागला तर मी कुठे जाऊ?"

निरुत्तर करून टाकलं होतं अश्विनीच्या प्रश्नाने मला.

दोन्ही बाजूचं वातावरण आता बऱ्यापैकी निवळलं होतं. पण आयुष्य पूर्वपदावर आलं नव्हतं अजून. ऑफिस आणि घर असंच चाललं होतं. घरी बराच वेळ देत होतो. क्वालिटी टाइम. दोन आठवडे झाले मरीन ड्राईव्हलाही गेलो नव्हतो, मग एका शुक्रवारी राधिकाने भेटूया का असं विचारलं. सर्व पुन्हा सुरळीत करण्यासाठी मी सुद्धा धडपडत होतो. लगेच होकार कळवला.

"गुरू, आय लव्ह यु" राधिका अगदी डोळ्यात डोळे घालून बोलली. "होय, आय लव्ह यु. तू बरोबर ऐकलंयस." माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव बघून ती पुन्हा बोलली.

मला वाटलं एव्हाना राधिका सावरली असेल, पण तिच हे ऐकून मी पुन्हा बुचकाळ्यात पडलो.

"डोन्ट वरी, गुरू. मी हे बोलतेय कारण माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. पण उत्तरादाखल काहीच अपेक्षा नाहीयेत. तुझं माझ्यावर प्रेम नसलं तरी माझं आहे. तूझं असणं हे माझ्या आयुष्यात घडलेली सर्वात चांगली गोष्ट आहे. आज सांगण्याचा उद्देश असा की.." तिने दोन क्षण पॉज घेतला पण माझं हृदय डबल स्पीड ने धडधड करू लागलं.

"उद्या मी राजीनामा देणार आहे. आणि हे शहर ही सोडून जाणार आहे. मला दुसऱ्या शहरात चांगला जॉब मिळाला आहे. तुझ्याशी संपर्क ठेवायचा नाहीये म्हणून कुठे जातेय हे सांगू इच्छित नाही मी तुला."

"राधा, मी सर्व ठीक करतो. तू घाईत निर्णय घेऊ नकोस प्लिज." मी घाई घाईत बोललो. ती माझ्या आयुष्यात नसण्याच्या कल्पनेने मी बिथरलो होतो आता.

"गुरू, तुझ्या नकळत ही तू खूप दिलंयस मला. आता अडवू नकोस. मला माहीत आहे, तुझ्या मनात मला खूप उच्च स्थानी तू ठेवलं आहेस, पण ती जागा माझी नाही. तू तुमच्या नात्याला योग्य न्याय द्यावास, आणि तू देशीलच ह्याची खात्री आहे मला."

"राधा, प्लिज. नको ना..असं का.. मी करतो..आपण करू..आय मिन.." मी खूप काही बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण तोंडातून धड वाक्य बाहेर पडत नव्हतं. खूपच बिथरलो होतो मी.

"गुरू, मला कमकुवत बनवू नकोस प्लिज. हॅपी नोट वर विलग होऊयात आपण. तुझ्या गोड आठवणी घेऊन जाऊ देत मला."

मग पुढे मला बोलू न देता ती पटकन उठली आणि हळुवार ओठ माझ्या गालावर टेकवुन निघूनही गेली, डोळ्यातील आसवं दिसू न देता. मी तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे फक्त बघत बसलो होतो.

मावळतीचा सूर्य क्षितिजा पल्याड केव्हाच हरवून गेला होता आणि त्याच बरोबर माझ्या आयुष्यातील एक सोनेरी स्वप्न...

शरद नारायण यादव


प्रतारणा (भाग चार)

          "तरी तुला सांगत होतो, शरीर सुख घेऊन मोकळा हो. आता गेली ना हातची संधी. मला तर खात्री आहे की तिला वाटत असेल तू काही करूच शकत नाहीस, म्हणून तिनेच पुढाकार घेतला ह्यावेळी पण." रघुनाथ नेहमीप्रमाणे माझ्या जखमेवर मीठ चोळत होता.

माझ्या तर अंगाचा तिळपापड होत होता. खरंच तिला असं वाटलं असेल का, की मी काही करू शकत नाही ते? म्हणून ती दीपक कडे आकर्षित झाली असेल का? छे छे, ते शक्य नाही. इतके उथळ आणि स्वार्थी विचार तर नक्कीच नाहीत तिचे.

अलिप्त राहूनच ह्या नात्याची खरी मजा आहे. वाहवत गेलो तर आयुष्याची माती ठरलेली. वेळीच मी स्वतःला सावरलं, आणि पूर्व आयुष्यावर आलो.

आता शुक्रवारचं भेटणं बंद झालं होतं. मी ही ते मान्य केलं होतं. तसंही प्रमोशन नंतर ऑफिसमध्ये कामाचा व्याप वाढला होता. नवीन रोल मध्ये जास्त मजा येत होती. वैयक्तिक आयुष्यातही मी माझ्या मनोरंजनाच्या कक्षा रुंदावल्या होत्या. जुन्या मित्रांमध्ये वेळ छान जात होता. तबला वादनाने मन तजेलदार होत होतं. कधीतरी सोलो ट्रिप करून स्वतःलाच भेटून येत होतो. शनिवार रविवार अश्विनी आणि मुलांसोबत मजेत जात होते. राधिकाने दाखवलेल्या मार्गावर माझी गाडी आता सुसाट सुटली होती.

पण कुठेतरी तिच्या सहवासाची कमतरता आणि तिच्याविषयीची शारीरिक ओढ अजूनही जाणवत होतीच.

कधी नव्हे ते अश्विनीने ट्रेकला जाऊया असं सुचवलं होतं. भंडारदऱ्याला छोटासा ट्रेक आणि रात्रीचा कॅम्प असं त्या ट्रेकिंगच्या गृपचा प्लॅन होता. मुलांना आई आप्पांच्या स्वाधीन करून आम्ही दोघेच जायचं असं ठरलं.

लग्नानंतर खूप वर्षांनी आम्ही दोघेच बाहेर पडलो होतो. आम्ही दोघेही खूप उत्साहात होतो. भंडारदऱ्या ला पोचलो आणि ग्रुप जॉईन केला आणि बघतो तर काय ग्रुप मध्ये राधिका.

"काय योगायोग आहे राधिका. पण एकटीच आली आहेस का की कोणी आहे सोबत?" तिची अश्विनीशी ओळख करून देत मी विचारलं.

"एकटी नाहीये सर, दीपक आलाय माझ्याबरोबर." मग पुन्हा नव्याने दीपक बरोबर ओळख समारंभ झाला. राधिकाने दुसऱ्यांदा माझ्याशी करून दिलेल्या ओळखीमुळे दीपक गोंधळूनच गेला पण राधिकाने वेळ मारून नेली.

चालता चालता लहान लहान ग्रुप झाले. मी अन दीपक मागे होतो.

"सर तुमचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. मला तर तिशीतच धाप लागतेय."

"अरे मला आवडतं ट्रेकिंग वैगेरे, निसर्गाच्या सानिध्यात छान वाटतं."

"राधिकाला पण खूप आवडतं हे, पण मला नाही आवडत. छान घरी झोपणार होतो आज. ते सोडून जंगल तुडवायला बोलावलं तिने."

"काय काय आवडतं मग तुला?"

"सर मला ना क्रिकेट खेळायला आवडतं ,पण मोबाइल मध्ये. पब-जी मध्ये तर मास्टर झालोय मी. टिक टॉक बघायला आवडतं. शनिवारी रविवारी मस्त झोपतो मी सकाळी अकरा वाजेपर्यंत. मग जेवून पुन्हा दुपारी झोपतो. टीव्ही वर सिरिअल्स बघतो रोज. एकंदरीत मला घरातच रहायला आवडतं."

त्याच्या बोलण्याने मी चकित झालो. राधिकाला कसा आवडला हा? राधिका त्याच्या अगदी विरुद्ध होती. निसर्ग, कला, माणसांमध्ये रमणारी. नेहमी कशात तरी व्यस्त असणारी. तिच्या तुलनेत तर दीपकने त्याचं आयुष्य वाया घालवलं होतं.

ट्रेक संपला आणि रात्रीचं जेवून आम्ही कॅम्प फायर  सुरू केला. धमाल गाणी गप्पा आणि डान्स सुरू होता. मी अन अश्विनी तर यथेच्छ आनंद घेत होतो. दीपक आपलं करायचं म्हनून काहीतरी करत होता.

मग छोटा ग्रुप झाला आणि गप्पा सुरु झाल्या. तलावाच्या किनारी टेंट लावले होते आणि छोटीशी शेकोटी करून आम्ही चौघे गप्पा मारत होतो.

"सर मला आयुष्यात तुमच्या सारखं व्हायचं आहे."  दीपक बोलला.

"माझ्यासारखं? म्हणजे कसं?" मी विचारलं.

"मॅग्नेटिक पर्सनलिटी आहे तुमची. काय गायलात आणि डान्स केलात. एकदम पॉप्युलर झालात ग्रुप मध्ये. मला असंच व्हायचंय."

"मॅडम, खरंच तुम्ही खूप लकी आहात, सर तुमचे पती आहेत." राधिका बोलत होती. तिच्या नजरेत आज मला वेगळेच भाव दिसत होते. मनाला काही तरी जखम झाल्यासारखं वाटत होतं.

"सर खरंच सर्वगुणसंपन्न आहेत. किती काळजी घेतात तुमची, मी पाहिलंय. कौटुंबिक जबाबदारी पाळत ते वैयक्तीक पातळीवर पण खूप समाधानी दिसतात. ह्याच बरंच श्रेय तुम्हालाही जातं."

"नवरा म्हणून खूप छळतात ते, तुला नाही माहीत." अश्विनी मस्करीत बोलली आणि हसायला लागली.

"देव करो असाच नवरा मलाही मिळो." राधिका बोलता बोलता बोलून गेली. आणि ग्रुप मध्ये दोन क्षण अवघड शांतता पसरली. माझी आधी अश्विनीशी आणि मग राधिकाशी नजरानजर झाली. खूपच अवघड क्षण होता तो. मग दीपक शिताफीने विषय बदलला. म्हणजे अगदीच मठ्ठ नव्हता तो.

राधिकच्या मनात काहीतरी कालवाकालव चाललीये हे नक्की. आता घरी गेल्यावर अश्विनी कशी रिऍक्ट होणार हे ही बघावं लागणार होतं.

राधिकाचं वागणं बालिश होतं असं समजून अश्विनीने सोडून दिलं होतं. पण मला माहीत होतं की राधिका बालिश तर नक्कीच नाही. हळू हळू कळेलच ह्या विचाराने मी राधिकाला पटकन काही बोललो नाही. पण सावध पवित्रा घेतला.

दोन आठवडेच झाले असतील जेमतेम, राधिकाने शुक्रवारी भेटण्याबद्दल विचारलं.

"गुरू, किती निष्ठुर आहेस रे तू?" चौपाटीवर बसताच अचानक तिने हल्ला केला होता.

"काय केलं मी?"

"दीड महिना झाला आपल्याला लास्ट टाइम चौपाटीवर भेटून, त्यानंतर एकदा तरी स्वतःहून भेटायला बोलावलंस? खूप बदललायस तू."

"अगं पण शुक्रवारी तू दीपकला भेटत असशील असं वाटलं मला. आणि ट्रेकला भेटलोच की आपण. काय योगायोग होता, नाही?"

"कोण म्हणतं योगायोग होता? तू फेसबुक वर लाइक केलं होतंस ट्रेकिंग ग्रुपच पेज आणि त्या दिवशीच्या ट्रिप साठी होकार ही कळवला होतास. म्हणूनच मी आले होते." माझ्या मनात जी शंका होती ती खरी ठरली होती म्हणजे. राधिकाच्या मनात बरंच काही चाललं होतं.

"अगं पण दीपक आवडतो ना तुला?"

"ते ही तूच ठरव आता. मी त्याच्याशी लग्न करणार आहे पण माझं त्याच्यावर प्रेम नाहीये."

"मग ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी लग्न कर." मी अगदी पटकन बोलून गेलो.

तिने खूप प्रयत्नाने हुंदका गिळला आणि बोलायला लागली.

"दीपकचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून त्याच्याशी लग्न करण्याचं ठरवलंय मी. पण तुझ्यावर माझा काहीच हक्क नाहीये का रे ? आठवड्यातला एक तास हवाय तुझा. अश्विनीबरोबर मुव्ही बघायला गेला होतास काल, फेसबुक वर कळलं मला. आणि मला तुझ्या एका तासासाठी दीड महिना वाट पहावी लागली." राधिका खूप आगतिकतेने बोलत होती.

"माझ्या भावनांची तुझ्या लेखी काही किंमत आहे की नाही? लोणावळ्याच्या त्या प्रसंगानंतर एका तरुण मुलीच्या मनाची काय घालमेल झाली असेल ह्याचा एकदा तरी विचार केलास तू? तू ओढत न्यावं आणि मी फरपटत यावं, हे असंच हवंय का तुला? ठीक आहे. तेही मला मान्य आहे. पण प्लिज असं परक्या सारखं वागू नकोस माझ्याशी. मला माझा जुना गुरू हवाय." राधिका खूपच भावुक झाली होती.

खूपच गोंधळात टाकणारं होतं ते सर्व. अप्रत्यक्षपणे राधिकाशी प्रतारणच होती का ही?

क्रमशः

शरद नारायण यादव


प्रतारणा (भाग तीन)

          मागच्या दीड दोन वर्षात खरंच खूप बदल झाला होता माझ्यात. सकारात्मक बदल. आणि हा बदल घरातही सर्वांना आवडला होता. जास्त आनंदी, जास्त उत्साही झालो होतो मी. पण ह्या बदला मागचं कारण मी कोणालाही सांगू शकत नव्हतो.

"राधा, एक गोष्ट खटकतेय ग मनात खूप दिवसांपासून."

"आयुष्य हे असंच असतं, गुरू. सांग काय खटकतंय?" एव्हाना ऑफिस बाहेर गुरू आणि ऑफिसमध्ये सर असं सुरू झालं होतं.

"असं लपून भेटणं, बायकोला ही न सांगणं मला दिवसेंदिवस जड जातंय."

"गुरू, मी पण एक स्त्री आहे. म्हणून मी सांगू शकते की अश्विनीला नाही समजू शकणार आपलं नातं. तुला आणि मला माहीत आहे की आपलं नातं पवित्र आहे. पण हे तू कसं पटवून देणार तिला? आणि जर तिलाच नाही पटवून देऊ शकत तर बाकी लोकांना काय आणि कसं सांगणारेस? तुला कम्फर्टेबल नसेल वाटत तर नको भेटायला."

मी विचारचक्रात अडकलो होतो. राधिकाने मला नव्याने माझी ओळख करून दिली होती. आनंदाने जगण्याचा मार्ग दाखवला होता, तो ही सोप्या पद्धतीने. तिला न भेटण्याचा विचारही मी करू शकत नव्हतो.

"कसला विचार करतोयस एवढा?" तिने माझी विचारशृंखला तोडली. "माणूस म्हणून खुश राहण्याचा अधिकार आहे तुला, आणि मलाही" तिच्या शेवटच्या शब्दाने हळुवार तरंगायला लागलो होतो मी. तिला ही माझ्यावाचून नव्हतं रहावणार. तिच्याच शब्दात सांगायचं तर ऍडीक्टिव्ह पर्सनॅलिटी होती माझी.

अपराधीपणाची भावना नष्ट व्हायला लागली होती आता. अश्विनीच्या आणि मुलांच्या हिश्शातला गुरू मी कधीच हिरावला नव्हता.

इकडे राधिकाचं बोलणं वागणं खुपच मोकळं होत चाललं होतं. एकदा बँकेच्या कामासाठी मला पुण्याला जायचं होतं. राधिकालाही सोबत यायचं होतं तिने तसा हट्टच धरला. मग मीही आढे वेढे न घेता तिला यायला सांगितलं. सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं होतं.

काम झाल्यावर परत येताना ती म्हणाली लोणावळ्याला सनसेट पॉईंट बघुन जाऊयात. ऑफिसचं मोठ्ठं काम झाल्याच्या खुशीत होतो मी पण.

सनसेट पॉईंट वर येऊन बसलो, जिकडे तिकडे हिरवळ. नुकताच पाऊस पडून गेला होता. सूर्य पश्चिमेला कलला होता आणि आकाशात तांबूस हलकी छटा पसरली होती. आणि त्यात राधिकाची कंपनी. अहाहा! स्वर्ग सुखच.

बोलता बोलता कधी विषयांतर होत गेलं कळलंच नाही. खूप हळव्या विषयावर चर्चा सुरू होती आणि अचानक राधिकाने तिचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले. मनसोक्त आनंद घेतल्यावर ती बाजूला झाली आणि रडायलाच लागली. तिच्या भावना अनावर झाल्या होत्या. स्वतःच्या भावनांवरच नियंत्रण ती हरवून बसली होती.

मुंबईला येईपर्यंत आम्ही दोघेही निशब्द. ह्या आधी तिने कित्येकदा हग केलं होतं मला, पण त्यात काही वेगळं वाटलं नव्हतं. पण आजची गोष्ट वेगळी होती, खूप वेगळी.

त्या पुढचे दोन दिवस नजरानजर ही झाली नाही आमची. सगळंच संपलं असं वाटलं. मग शुक्रवारी मरिन ड्राईव्ह ला आल्यावर मीच सुरवात केली बोलायला.

"राधा, झालं ते.."

"झालं ते छानच झालं, मला आवडलं" मला थांबवत ती बोलली. "गुरू, एका वेळेची गोष्ट होती ही. वन टाइम थिंग. पुन्हा असं होणार नाही. आणि तू अपेक्षा ही करू नकोस."

तिच्या अश्या बेधडक बोलण्याने मनातला ताण कुठल्या कुठे निघून गेला. एवढी अवघड गोष्ट तिने किती लीलया हाताळली होती. झालेल्या गोष्टीमुळे मैत्रीवर काही फरक पडणार नव्हता. मी पुन्हा निर्धास्त झालो.

पण लोणावळ्याच्या त्या प्रसंगानंतर, माझ्या मनातून तिचा तो स्पर्श काही केल्या निघत नव्हता. घरी अश्विनी बरोबर प्रणयाने कितीही मन भरलं , तरी फिरून फिरून ती संध्याकाळ आठवतच होती. तिचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. काय हरकत होती ती संध्याकाळ पुन्हा पुन्हा अनुभवायला? ह्या गोष्टीने आमच्या मैत्रीत काही फरक पडणार नव्हताच.

पण राधिकालाही तेच हवं असेल का? ती तर स्पष्ट बोलली की पुढे काही अपेक्षा ठेवू नकोस. ह्या शुक्रवारी सोक्षमोक्ष लावायचाच ह्या गोष्टीचा.

मी मरीन ड्राईव्ह वर वाट बघत बसलो होतो एवढ्यात राधिकाचा वॉट्स ऍप मेसेज आला, 'आज जमणार नाही भेटायला'. माझा तर असा अपेक्षाभंग झाला की राधिकाशी बोलणंही नको झालं. खूपच राग आला होता तिचा.

घरी पोचतोय एवढ्यात तिचा पुन्हा मेसेज, 'गुरू आज मी खूप खुश आहे. कधी एकदा तुला भेटते असं झालंय.' मी रागात असल्याने रिप्लाय केलाच नाही.

सोमवारी ऑफिसला आल्या आल्या ती बोलली, आज संध्याकाळी मरिन ड्राईव्ह. मी मनात म्हंटलं कशी आली वठणीवर. पुन्हा मी स्वतःवरच खुश होऊन संध्याकाळची वाट पाहू लागलो. आज पुन्हा लोणावळा साजरा करायचा ह्या विचाराने मी मनोमन खुश होत होतो.

संध्याकाळी चौपाटीवर आलो तर माझ्या आधी येऊन बसली होती, आणि सोबत होता एक युवक. तिच्याच वयाचा असेल.

"सर, हा माझा मित्र दीपक. शाळेपासून चा जिवलग मित्र आहे." तिने ओळख करुन दिली पण हा इथे काय करतोय हाच मुद्दा माझ्या डोक्यात होता.

"हॅलो सर, खूप ऐकलंय तुमच्या बद्दल राधिका कडून" दीपक बोलला.

"सर, तुम्हाला म्हंटलं ना, आनंदाची बातमी सांगायची आहे. ह्याने मला लग्नासाठी विचारलं आहे आणि मीही होकार कळवलाय"

माझ्यातर पायाखालची जमीन सरकत होती. ती काय बोलतेय हेच मुळी कळत नव्हतं.

"अजून घरी सांगितलं नाहीये, पण लवकरच सांगू" राधिका आनंदाने सांगत होती.

माझ्या तर सगळ्या उत्साहावरच पाणी ओतलं होतं राधिकाने. मी विचारांचे काय काय इमले रचत होतो आणि तिने सपशेल यु टर्न घेतला होता. अशी अलिप्त कशी राहू शकते ती? इतक्या जवळ येऊनही तिच्या मनाला काहीच स्पर्श झाला नव्हता का? की तिच्यासाठी हे नेहमीचं होतं? म्हणजे राधिका माझ्याशी प्रतारणा करत होती?

क्रमशः

शरद नारायण यादव


प्रतारणा (भाग दोन)

          "गुरू, नशीब काढलंस लेका. तरुण मुलगी स्वतःहून तुला फिरायला बोलावते काय? तुझं अगदी बारीक निरीक्षण करते काय? अरे आमच्या तर दृष्टीस ही नाही पडत रे अश्या मुली." माझा बालपणीचा मित्र रघुनाथ आपली अक्कल पाजळत होता. मन अस्वस्थ झालं होतं मरीन ड्राईव्ह च्या भेटीनंतर. खूप विचार करून झाला होता पण काही सुचत नव्हतं.

"माझंच चुकलं. तुझ्याशी एवढ्या संवेदनशील विषयावर बोललो. अरे खूप विचार केलाय मी पण, बऱ्याच अंशी खरं आहे तिचं. स्वतःसाठी विशेष असं काही केलंच नाही रे. ना पान तंबाखू, दारूचं व्यसन, ना दुसरा काही वाईट नाद. काय पाहिजे मला तेही माहीत नाही."

"मग काय करायचं ठरवलं आहेस? हे बघ जे चाललंय ते योग्य आहे. ती कालची मुलगी काय सांगणार रे तुला? तिच्या नादाला लागू नकोस, अश्या मुलींबद्दल बरंच ऐकलंय मी."

रघुनाथच्या बोलण्यानंतर मी थोडा सावध झालो, कदाचित राधिकाचा काही वेगळा प्लॅन तरी नसेल? पण मन स्वस्थ बसू देईना. शुक्रवार जवळ येऊ लागला. जास्तीत जास्त काय वाईट करणार ती, हा विचार करून शुक्रवारी संध्याकाळी भेटायचं ठरवलं. पुन्हा मरीन ड्राईव्हलाच.

गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस एकदम सोबर आणि बिना फ्रेम चा चष्मा. उगीच नाही तिच्या मागे पुढे करत ऑफिस मधले लोक.

"बसा सर, आरामात बोलू आज. आवडतं मला तुमच्याशी बोलायला. कुठून सुरवात करूया?" राधिका

"मला पटलंय तुझं म्हणणं, आता पटकन उपाय सांग ह्याच्यावर. माझ्या मनातील घालमेल कशी बंद होईल?"

"अहो सर, माझ्याकडे जादूची कांडी नाहीये. आणि तसही तुमचा प्रश्न तुम्हालाच सोडवावा लागणार आहे. तरी तुम्ही लकी आहात सर. तुम्हाला खूप लवकर जाणीव झालीये, तुम्हाला काहीतरी सलतय ह्याची. काही काही लोकांचं तर अख्खं आयुष्य निघून जातं पण आंतरिक सुख काही मिळत नाही " राधिका बोलत होती खूप गहिरं, खूप अर्थपूर्ण. ऐकतच राहावं असं वाटत होतं.

"सर, काही लोकांना कळतं की त्यांचं सुख कशात आहे ते, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तेव्हा तर खूपच पश्चाताप होतो. वेळ खूप अमूल्य आहे आणि जीवन खूप लहान. येणाऱ्या प्रत्येक क्षणात पूर्ण जगलं पाहिजे, एकदा का तो क्षण गेला की गेलाच. मान्य आहे मला की वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे प्रश्न असतात, पण बॅलन्स का करू नये माणसाने? कमी पैशातही खूप सुख मिळतं की, फक्त पैशाचाच प्रश्न असेल तर. जो पर्यंत एखादा प्रश्न सुटत नाही तो पर्यंत मी सामान्य आयुष्य जगणार नाही, असा काहींचा अट्टाहास असतो. आणि तो प्रश्न सुटला की? लगेच नवीन प्रश्न उपस्थित. हेच आयुष्य आहे. देन व्हाय स्टॉप लिविंग?"

एक मोठ्ठा उसासा टाकून मी तिच्याकडे बघतच राहिलो. काहीही न बोलता. आप्पांनी सांगितल्या प्रमाणे माझा अहंकार बाजूला ठेवून राधिकचं शिष्यत्व पत्करण मला इष्ट वाटत होतं.

"आता नीट कळलंय नक्की काय खदखदत होतं ते. पण मार्ग काय यातून पुढे?" मी सपशेल शरणागती पत्करली.

"त्या साठी तुम्हाला माझा क्लास लावावा लागेल आणि फी पण द्यावी लागेल." तिने चौपाटीवरच्या पाणी पुरीच्या गाडीकडे बोटं दाखवून सुचवलं. आणि अगदी निरागस हसली.

कित्येक वर्षानंतर पाणीपुरी आणि बर्फाचा गोळा खाल्ला आज. लहान गोष्टीत आनंद असतोच की. आज इथे येऊन घेतलेली रिस्क सत्कारणी लागली.

आता शुक्रवारची वाट मी पाहू लागलो, ऑफिस मध्ये ती दिसत होती पण चौपतीवरची ती जास्त भावत होती.

स्वतःवर प्रेम करा, हा तिचा पहिला धडा मी गिरवत होतो. तिच्या टापटीप राहण्यामागच रहस्य कळलं होतं आता. जरी पूर्ण घरची मदार तिच्यावर होती, तरी स्वतःसाठी इतकं तरी करणं मस्ट आहे असं तिचं म्हणणं होतं. तिच्या पुढच्या संघर्षसाठी बळ मिळत होतं तिला ह्यातुन.

किती सोप्प होतं हे, स्वतःला प्रयत्नपूर्वक खुश ठेवायचं. आणि तेही अगदी लहान लहान गोष्टी करून. केस कापायला गेलो, जिथे पन्नास रुपयात काम होत होतं तिथे अजून शंभर रुपये देऊन मसाज केला. खूप फ्रेश आणि मोकळं मोकळं वाटलं. इतके वर्ष ह्या सुखा पासून वंचित, का? तर, धोपट मार्ग सोडला नव्हता.

स्वतःला गोंजारण्याची ही गोष्ट मला आवडू लागली. मन प्रसन्न राहवू लागलं. हळू हळू माझ्या वागण्या बोलण्यात फरक जाणवू लागला.

"गुरू चांगलाच फरक पडलाय की रे तुझ्यात." नेहमीप्रमाणे एका रविवारी भेटलो तेव्हा रघु आश्चर्याने म्हणाला. "अगदी राजेश खन्ना वाटतोयस. त्या पोरीने चांगलीच जादू केलीय म्हणायची."

"उगाच काही बोलू नकोस रघु. स्पष्ट विचारांची सरळमार्गी मुलगी आहे ती. जादू वैगेरे काय?"

"अरे राग आला? थट्टा केली रे. दर शुक्रवारी भेटता का मग चौपाटीवर?" मिश्किल हसत हो बोलला

"हो, भेटतो. काय गैर आहे त्यात. निखळ मैत्री आहे आमची." मी जराश्या रागातच.

"ह्या वयात कसली निखळ मैत्री घेऊन बसलास? ह्या गोष्टीचा अंत एकचं. संभोग!!"

"काय? अरे काय बोलतोयस तू? वयाने लहान असली तरी ती मैत्रीण आहे माझी. विचार जुळतात माझे तिच्याशी. न सांगताही तिला कळतंय आताशा की काय चाललंय मनात ते."

"म्हणजे मनाने तुम्ही जोडले गेले आहात. हाच सेक्स सर्वोत्तम असतो, जिथे दोन मनं जोडली गेली आहेत."

"त्या हिशोबाने तर मी तुझ्याशी सेक्स करायला हवा होता, बालपणीचा मित्र आहेस ना तू?" मला खूपच राग आला होता आणि कीव येत होती की माझा मित्र असा विचार करू शकतो.

पण त्याचं तरी काय चुकलं होतं. आपला समाज नेहमी असाच विचार करत आलाय. असं मैत्रीचं नातं असूच शकत नाही, हेच बुरसटलेले विचार रुजत आलेत आपल्या मनावर. मीही असाच विचार केला असता का जर माझ्याजागी रघु असता तर?

माझ्या मनात पाप नाही, पण माझी मैत्री उघड नाहीये. सौ ला, माझ्या सहकाऱ्यांना कळू नये असं वाटतं ह्या मैत्री बद्दल.

म्हणजे मी माझ्या नात्यात प्रतारणा करतोय का?

क्रमशः

शरद नारायण यादव


प्रतारणा (भाग एक)

बेचाळीस वर्ष पूर्ण झाली आज आपल्याला. मागे वळून पाहताना अभिमान वाटावा अशीच वाटचाल होती की. तरीही एक हुरहूर का आहे मनात? काही तरी करायचं राहून गेलंय का? पुन्हा पुन्हा विचार करून पहिला. तरी पण मन शांत होत नाहीये.

आई आप्पांनी परिस्तिथी नसताना शिकवलं. आपणही त्यांच्या कष्टाचं चिजचं केलं की. समाधानकारक नोकरी आहे बँकेत. कर्जाने का होईना चार खोल्यांचं घर आहे मुंबईत. आईच्या नात्यातली मुलगी सून म्हणून आणली तिने घरात, आता नक्षत्रां सारखी दोन मुलं आहेत.

आई आप्पा नातवंडांच्या किलबिलाटात समाधानी आहेत. सौ तिचं ऑफिस, घर, आणि माहेर ह्या सर्वांत व्यस्त आहे, आणि खुशही आहे. मुलं आप आपल्या शाळेत रमलीयेत. देवाच्या कृपेने काही कमतरता नाहीये. मग ही रुखरुख का? ही अस्वस्थता का?

बालपणीचा मित्र मदत करेल असं वाटलं म्हणून त्याच्याशी पण दीर्घ चर्चा करून झाली, पण निष्कर्ष काही नाही. आला दिवस ढकलत होतो, दिवसभरातील सगळी कामं यंत्रवत सुरू होती. कोणत्याच भावनेचा साधा लवलेशही कुठे नाही.

अश्यातच बँकेत भरती सुरू होती आणि माझ्या खात्यात चार नवीन कर्मचारी रुजू झाले. त्यात होती राधिका, सर्व सामान्य घरातलीच, अठ्ठावीस वर्ष वय असेल. चार चौघात उठून दिसेल असं रूप आणि विचारही तसेच.

सहा आठ महिन्यातच वागण्या बोलण्यात बरीच मोकळीक आली होती, कामात तर तरबेज होतीच. घरी आई बाबा आणि लहान भाऊ. वडील पोस्टात कारकून होते. तर लहान भाऊ अजून शिकत होता. म्हणजे राधिकाच्या कमाईवर बरीच बडदास्त होती. तिच्या आत्मविश्वासावर मात्र ह्या पैकी कोणत्याच गोष्टीचा विपरीत परिणाम झाला नव्हता.

नेहमी नीटनेटके कपडे आणि शोभेल असा मेकअप. राहणीमान ही दर्जेदार होतं. ऑफिस मधील तरुण आणि मध्यमवयीन सुद्धा आता तिच्या मागे पुढे करताना दिसत होती. सगळ्यांशी तिचं पटतं होतं. कोणाला दुखावत नव्हती किंवा कोणाशी उगीच लगट करताना ही कधी कानावर पडलं नव्हतं.

मग अवांतर गप्पा व्हायला लागल्या. तिच्या वयाला न झेपणारी विचारांची समृद्धी आणि समजूतदार पणा होता तिच्याकडे. कदाचित आयुष्याने शिकवलं असेल.

"सर राग येणार नसेल तर एक विचारू?" एका संध्याकाळी राधिकाने कॉफी घेत विचारलं.

"असं काय विचारणार आहेस?"

"वैयक्तिक विचारायचं आहे, तुमची परवानगी असेल तर विचारते, आणि तुम्हाला नसेल सांगायचं तरी चालेल."

"बरं विचार" मी परवानगी दिली.

"सर, तुम्ही आतून उदास आहात असे दिसता. वरून वरून जरी तुम्ही सामान्य दिसत असलात तरी, आत काही तरी खदखदतय. काही बिनसलंय का?"

"हा काय उद्धटपणा आहे?" मी रागावूनच विचारलं. तशी ती माफी मागून निघून गेली. दुसऱ्या दिवशी शनिवार, बँक बंद होती. तिचा प्रश्न मला विचार करायला भाग पाडून गेला. मग मी घरी सौ ला,  माझ्या बाल मित्राला, एका जवळच्या सहकाऱ्याला विचारलं की मी दुःखी कष्टी वैगेरे वाटतो का?

सगळ्यांनी नाही असंच उत्तर दिलं. मग सोमवारी ऑफिसला आलो आणि राधिकच्या बोलण्यात काही तथ्य नाहीये हे तिला सांगावं म्हणून केबिन मध्ये बोलावलं.

"बस राधिका, तुझ्या प्रश्नावर बराच विचार केला मी."

"सॉरी सर, माझी चुकी झाली. लहानतोंडी मोठा घास घेतला मी."

"तरी पण मला आधी सांग तुला असं का वाटलं? आणि मी माझ्या जवळच्या माणसांकडे पण बोललो ह्या बद्दल आणि उत्तर आहे की मी आतूनही दुःखी नाही आणि बाहेरूनही नाही." मी काहीश्या विजयी मुद्रेने म्हंटलं.

"सर फार छान झालं की माझा अंदाज चुकला."

"मी माझ्या करिअर मध्ये यशस्वी आहे, कौटुंबिक जीवनात समाधानी आहे, सामाजिक जीवनात माझा म्हणावा तसा दबदबा आहे. अजून काय हवं माणसाला आयुष्यात? सर्व बाजुंनी खुश आहे मी. आणि म्हणूनच तुझा अंदाज चुकला आहे."

"पण सर, वैयक्तिक जीवना बद्दल विचारलं होतं मी. करिअर, कुटुंब आणि समाज हे तुमच्या पासून वेगळं केलं तर तुम्ही खुश आहात? माणूस म्हणून आनंदी आहात?" आजच्या तिच्या प्रश्नाने मला जमिनीवर आदळलं होतं. इंटरकॉम वर फोन आल्याने ती निघून गेली पण मी दिवसभर विचारातच पडलो.

माझा अहंकार दुखावला होता, बारा चौदा वर्षांनी लहान असून अगदी मर्मावर बोट ठेवलं होतं तिने. माझी ज्ञानलालसा शांत बसू देईना. घरी येऊन आप्पांशी बोललो सविस्तर. आंतरिक सुखाबद्दल विचारलं, तेव्हा कळलं की ज्ञान हवं असेल तर गुरू करायल हवं.

आठवडाभर आंतरिक सुख कसं मिळेल हाच विचार करत होतो, बाल मित्राला विचारलं, आंतरिक सुख हा शब्दही त्याचा गावी नव्हता. शेवटी राधिकाला शरण जायचं ठरवलं.

"राधिका, मला जाणून घ्यायचं आहे. तुला आंतरिक सुखाबद्दल काय माहीत आहे?" मी न राहवून तिला विचारलंच.

"पण त्या आधी मला सांगा, माझा अंदाज बरोबर होता ना?"

"हो, बऱ्याच दिवसांपासून मला पण जाणवतंय की काही तरी सलतय मनात. काही तरी कमी आहे. पण कळत नाहीये. तुझा अंदाज एकदम बरोबर आहे. पण तु असा अंदाज कसा बांधलास?"

"सांगेन, पण असं घाईघाईत नाही. तुम्हाला हरकत नसेल तर ऑफिस नंतर मरीन ड्राईव्हला आरामात बसू." असं बोलून ती निघाली. फक्त ऐकूनच मला घाम आला होता. कसं शक्य आहे ह्या वयात असं करणं. एक मुलगी असून असं बोलू शकते ती? काय बोलतील लोकं? ना ना विचार मनात येत होते. राधिकाच्या चारित्र्यावर ही संशय येत होता. आठवडा झाला तरी असं करायला मन धजावत नव्हतं. शेवटी मनाचा हिय्या करून शुक्रवारचं ठरलं.

ऑफिस सुटल्यावर फोर्ट वरून मरीन ड्राईव्ह ला आलो. खूप अपराधी वाटत होतं पण खूप उत्सुकता दाटली होती मनात.

"बसा सर. रिलॅक्स, येवढे अवघडून का बसला आहात? तुम्हाला कोणी बघत नाहीये इथे. मुंबईत इतका वेळ नाहीए कोणाकडे. तेव्हा आरामात बसा आणि मोकळे पणाने बोला."

"तसं काही नाही" मी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोललो आणि अवघडलेलं हसलो.

"सर, आता वर्ष होईल मला बँक जॉईन करुन. खूप चांगला अनुभव आहे माझा तुमच्यासोबत काम करण्याचा. पण सर मला माणसं वाचता येतात, आणि ती ही अचूक. दैवी देणगी म्हणा हवं तर. आणि तुम्ही तर संथ पाण्यासारखे आहात, अगदी तळापर्यंत दिसतंय."

"मला काही सुचत नाहीये."

"सुचेल, आधी तुम्ही हे विसरा की तुम्ही मॅनेजर आहात आणि मी तुमची सहकारी. दोन सामान्य माणसं बोलतायत असं संभाषण झालं तर फ्रुटफुल होईल."

"राधिका, तुला विचारांची श्रीमंती आहे, हे मला आधीच ठाऊक होतं. प्रथमदर्शनी तुला आंतरिक समाधान लाभलंय असं दिसतंय. खरं आहे का?".

"तुमच्या बद्दल बोलूया आज, माझ्याबद्दल तुम्हाला हळू हळू कळेलच. तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे."

"हा तुला अतिआत्मविश्वास नाही वाटत आहे का?"

"ठीक आहे सर, मी तुमच्याबद्दल मला जे वाटतयं ते  बोलते. तुम्हाला पटलं तर पुढे बोलूया नाहीतर भेळ खाऊन घरी जाऊया. सिम्पल.

"चालेल." आता आलोच आहोत तर ऐकून घेण्यात काय हरकत आहे, म्हणून मी थोडा सैलावुन बसलो.

"तुमच्या मनातील हुरहूर स्पष्ट दिसतेय मला. मला सांगा तम्हीच ब्रेड विनर ना घरात? आणि जवळजवळ शून्यातूनच हे विश्व उभं केलंय ना? ते घेतलेले कष्ट आणि परिस्थितीची असलेली जाण हे  स्पष्ट दिसतय तुमच्याकडे बघून. साधारण भारतीय आणि त्यातल्या त्यात महाराष्टीय घरातल्या कर्त्या पुरुषा प्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या आधी बाकीच्यांचा विचार करता ना? त्यांची स्वप्नं, त्यांचं सुख..सारं काही कुटुंबासाठी. आणी त्यांच्या सुखातच सुख मानायचं. राईट? स्वतःला काय हवंय ते माहीतही नसावं कदाचित, बरोबर?" अविरत बोलत होती राधिका.

"सर, कुठे हरवलात? मी कोणी ज्योतिषी नाहीये,पण ही नोकरी लागण्या आधी एका मनोचिकित्सका कडे अकाउंट बघत होते. तेव्हा पासून माणसं वाचायचा छंद लागला. सगळ्यांनाच सांगत बसत नाही हे पण तुमच्या बद्दल आदर आहे म्हणून बोलले." तिच्या बोलण्याने मंत्र मुग्ध झालो होतो मी.

"हवं तर विचार करा जर ह्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर हो असं असेल तर पुढच्या शुक्रवारी इथेच भेटू. नाहीतर लहान समजून मला माफ करा."

ती निघून गेली आणि बराच वेळ मी समुद्राकडे बघतच राहिलो अविश्वासाने..

क्रमशः

शरद नारायण यादव


आकर्षण (भाग सहा)

            "ओहोs श्रीकांत अंकल, हग्स आणि किसेस. कोण होती ती? गर्लफ्रेंड की काय?" प्रणाली मला चिडवत होती. मी शिताफीने विषय ...